इंधनाचे वाढत चाललेले दर आणि सीमेवर जवानांचे होणारे शिरच्छेद हेच देशाचे भविष्य आहे का? असा प्रश्न विचारत शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. इतकेच नाही तर राम मंदिर आणि हिंदुत्त्व या दोन मुद्द्यांवरूनही शिवसेनेने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वडिलकीच्या नात्यांने राज्यकर्त्यांचे कान उपटावेत असाही सल्ला शिवसेनेने दिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. मोहन भागवत यांनी राम मंदिर प्रश्नी मांडलेली भूमिका सचोटीची आहे पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश तरी उरला आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटले आहे अग्रलेखात?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत सांगितले की, अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर व्हायला हवे. संघातर्फे दिल्लीत तीन दिवसांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ही व्याख्यानमाला हिंदुस्थानचे भविष्य वगैरे अशा विषयांवर होती. व्याख्यानमाला संपल्यावर सरसंघचालकांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली. राम मंदिराचे काय होणार, हा प्रश्न पुन्हा चिघळवला जात आहे. ३७० कलमाबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचे भागवत म्हणतात. ३७० कलम हटवल्याशिवाय कश्मीर हा हिंदुस्थानचा भूभाग होणार नाही अशी संघाची भूमिका होती व त्या मतांशी ते कायम असतील तर ३७० कलम हटविण्यास विरोध करणार्‍या मेहबुबा मुफ्तीसोबत कश्मिरात भाजपने सरकार स्थापन केले त्याचे काय? ३७० कलम हटवले तर दंगे उसळतील असे मेहबुबांचे सांगणे होते. तरीही तिच्याशी सत्तेसाठी निकाह लावणे योग्य होते काय व हा निकाह लावण्यात ‘काझी’ची भूमिका पार पाडणारे राम माधव यांच्यासारखे संघ स्वयंसेवकच होते.

राम मंदिर हा प्रचाराचा आणि निवडणुकीचा मुद्दा बनला आहे आणि त्यामुळे हिंदुत्व चेष्टेचा विषय बनत चालला आहे. उत्तरेतील एका भाजपच्या नेत्याने तर अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, खुद्द पंतप्रधान मोदीही हादरले असतील. सुप्रीम कोर्टात भाजपचे वजन आहे. त्यामुळे राम मंदिरप्रश्नी आम्ही न्यायालयातून पाहिजे तसा आदेश घेऊन येऊ. राम मंदिराचा प्रश्न हा अशा काही मंडळींनी इतक्या खालच्या थराला नेऊन ठेवला आहे. राम मंदिर हा सेटिंग, मांडवली किंवा व्यापार आहे काय हे आधी स्पष्ट व्हायला हवे. सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय?

पेट्रोल, डिझेल १०० रुपयाला स्पर्श करीत आहे. कश्मीरच्या सीमेवर आमच्या सैनिकांची मुंडकी उडवली जात आहेत. त्यावर कुणी का बोलत नाही? पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही. गोरक्षणाच्या नावावर जो उन्माद झाला, माणसे मारली गेली. त्याच्याशी संघाचा संबंध नाही असे श्री. भागवत यांनी सांगितले, पण गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी हिंसा करायला रस्त्यावर उतरल्या तेव्हा हिंदू मतांच्या धुवीकरणाची नवी पहाट उगवल्याच्या आनंदात सगळे बेहोश झाले. हे चित्र हिंदूंच्या भविष्यासाठी बरे नाही.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticized pm narendra modi fuel price hike ram mandir other various issues in saamna editorial
First published on: 21-09-2018 at 07:56 IST