येत्या १२ तारखेला मी स्वतः रस्त्यावर उतरणार आहे. हिंमत असेल, तर अटक करा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘गर्जने’ची शिवसेनेने पुरती खिल्ली उडवली आहे. अटक करून दाखवा, या वक्तव्यात हिंमतीचा आणि मर्दानगीचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
फोटो गॅलरी: ‘रास्ता रोको’आधीच पोलीसांचे ‘मनसे रोको’
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘सलीम-जावेद’ने नाटकाचे स्क्रिप्ट असेच लिहिले आहे. त्यानुसार नायकाला अटक करावीच लागेल. गर्जना हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे व ‘अटक’ हा क्लायमॅक्स आहे! असेही अग्रलेखात लिहिण्यात आले असून, राज ठाकरे यांच्या रास्ता रोको आंदोलनामागे राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आघाडीचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. राज ठाकरे यांचे टोलविरोधातील आंदोलन त्याचप्रमाणे रास्ता रोको हे सर्व पूर्वनियोजित असून, त्याला राजाश्रय लाभला असल्याची टीका करण्यात आली आहे.
पुण्याच्या स. प. मैदानावरून रविवारी एका जुन्या नाटकाची नव्याने घोषणा झाली. जुन्याच संचात, त्याच नेपथ्यात, त्याच संवादात फक्त ‘नाव’ बदलून हे जुने नाटक रंगमंचावर येत आहे. मनसेप्रमुखांचे आवडते नाटक ‘मला अटक करा हो!’ रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाले असून विंगेतून अजित पवार, आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण यापैकी एकाने ‘घंटा’ वाजवताच पडदे सरकून नाटकाला सुरुवात होईल, या शब्दांत राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली आहे.