राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण बेभरवशाचे असल्याची टीका करीत बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. स्थिर सरकारचा आम्ही मक्ता घेतलेला नाही, या शरद पवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार अग्रलेखामधून घेण्यात आला आहे.
राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राष्ट्रवादीने तत्काळ भाजपास पाठिंबा जाहीर केला होता व त्याचा खुलासा असा केला होता की, ‘काय करणार? राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल अशी भीती वाटल्यानेच आम्ही भाजपास पाठिंबा देत आहोत.’ असे लिहून पवारांच्या या भूमिकेमुळे व त्यांच्या या हेतूने महाराष्ट्र बुचकळ्यात पडला. अर्थात महाराष्ट्राने बुचकळ्यात पडावे, असे निर्णय पवार नेहमीच घेत असतात, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.
राज्यातील विद्यमान सरकार अस्थिर असून ते कधीही पडू शकेल आणि मध्यावधी निवडणुका होतील, अशी धमकीच शरद पवारांनी दिली असल्याचे सांगून शरद पवार यांचे राजकारण बेभरवशाचे आहे व बेभरवशाचे राजकारणी हीच त्यांची ओळख आहे. म्हणूनच नव्या सरकारला आधी पाठिंबा व आता मध्यावधी निवडणुकांची भाषा हा त्याच बेभरवशाच्या राजकारणाचा भाग आहे. शरद पवार यांना असे वाटतेय की, महाराष्ट्राच्या राजकारणात ते हवी तशी उलथापालथ घडवू शकतात. आताही फक्त ४१ आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांना नव्या सरकारचे भविष्य आपल्या मुठीत ठेवायचे आहे. डळमळीत सरकारे हाच त्यांचा राजकारणाचा पाया आहे, अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.