शिवसेनेचे काही नेते आजही भाजपपुढे ‘दार उघड बये दार उघड’चे साकडे घालत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून यापुढे शिवसेनेकडे आशेने पाहू नका, असा सज्जड दम देण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख व ‘सामना’चे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांची ही भूमिका अंतिम असेल तर अजूनही सेना नेत्यांकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी सुरू असलेला ‘जोगवा’ नेमका कशासाठी आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेसला गेल्या पंधरा वर्षांत जेवढय़ा शिव्या पडल्या नसतील त्यापेक्षा जास्त शिव्या नव्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाचा तमाशा संपल्यानंतर पडल्या. जनतेच्या विश्वासाचा, आशाआकांक्षांचा जो कचरा विधिमंडळाच्या पहिल्याच आठवडय़ात झाला तो कचरा कोणत्या झाडूने साफ करणार, असा सवालही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी ‘सामना’मधून उपस्थित करण्यात आला आहे.
 एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेचा टेकू राष्ट्रवादीच्या भ्रष्ट बांबूंवर उभा असल्याची टीकाही केली आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेवर चोचा मारणारे अनेक गिधाडे फांद्याफांद्यांवर बसून आहेत व त्यांच्यापैकी काहीजण सत्तेच्या गाद्यांवर बसून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे स्वप्न पाहात असल्याचेही म्हटले आहे. यापूर्वीही सामनामधून गुजराती समाजावर टीका करण्यात आली होती, त्या वेळी उद्धव व आदित्य ठाकरे यांनीच ‘सामना’तील भूमिका पक्षाची नाही, अशी सारवासारव केली होती. मात्र सोमवारच्या अंकात शहा-मोदी-पटेलांसाठी शिवसेनेने केलेले उपकार विसरून भाजपपुढे मान डोलावतो असा जोरदार हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने मुंबईत गुजराती-मारवाडी समाजाने एकगठ्ठा मतदान भाजपला केल्यामुळे शिवसेनेने आपली नाराजी आज उघडपणे व्यक्त केली.
एकीकडे सेनेच्या मुखपत्रातून भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवत महाराष्ट्राच्या गळ्यात स्वाभिमानाचा हार घालण्याची भाषा वापरण्यात आली आहे तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी उघडपणे या विरोधात भूमिका घेत लवकरच सेना सत्तेत सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळेल, असे जाहीरपणे सांगितले. शिवसेना आज जरी विरोधी पक्षात असली तरी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर पुन्हा सत्तेत सहभागी होईल, असा मला विश्वास आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असेही मनोहर जोशी यांनी सांगितले. सरकारमध्ये सामील होण्यावरून सेनेतच दोन गट निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद घेऊनही पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांनी केंद्रातील सरकार व राज्यातील भाजप शासनाबाबत ठोस जाहीर भूमिका मांडण्याचे टाळून वैचारिक गोंधळाचे पुढचे पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.