भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने गुरुवारी केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ही मागणी केली.
खडसेंवर एकच आरोप नाही. दाऊदचा फोन इथपासून एमआयडीसीतील जमीन विकत घेणे, जावयाची लिमोझीन कार इत्यादी विविध आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नैतिकतेच्या दृष्टीने विचार केल्यास भाजप आणि शिवसेनेने यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. त्यामुळे लोकभावना विचारात घेऊन खडसे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
खडसेंवरील आरोपांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही. त्यांनीही भूमिका मांडली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. जळगावमधीलच सुरेश जैन हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सध्या तुरुंगात आहेत, मग तोच न्याय खडसे यांना का नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.