News Flash

“तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही…”, शिवसेनेनं प्रसाद लाड यांना सुनावलं!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

gulabrao patil on prasad lad
गुलाबराव पाटलांचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेना भवनाविषयी केलेलं एक विधान चांगलंच वादात सापडलंय. इतकं, की त्यावरून त्यांना दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरणाचा व्हिडीओ देखील रात्री उशिरा जाहीर करावा लागला. यादरम्यान प्रसाद लाड यांनी केलेल्या त्या विधानाचा शिवसेनेकडून खरपूस शब्दांमध्ये समाचार घेण्यात आला आहे. शिवसेना आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावर टीका करतानाच त्यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “प्रसाद लाड यांना माझं आव्हान आहे की त्यांनी तारीख कळवावी”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

प्रसाड लाड यांना प्रयोग करून बघावा…

गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “प्रसाद लाड हे सेना भवन फोडण्याची गोष्ट करत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी तारीख कळवावी. तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही तुमचं काय फोडू, हे तुमच्या लक्षात येईल. सत्तांतर होईल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण सत्तांतर होत नाही, म्हणून काहीही करून वातावरण विस्कळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या गोष्टी जाणणाऱ्या प्रसाद लाड यांच्यासारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून असे शब्द शोभत नाहीत. त्यांनी हिंमत असेल, तर तो प्रयोग करून बघावा”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

आधी विधान, नंतर घुमजाव

दरम्यान, प्रसाद लाड यांनी आपल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर घुमजाव केलं आहे. आपण तसं काही म्हणालोच नव्हतो, असं सांगणारा व्हिडीओ त्यांनी प्रसारीत केला आहे. “प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. पण ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.

अनादर करायचा नव्हता…

तसेच, “माझं असं म्हणणं होतं की आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आलं आहे, त्यावर माझं हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. जर मी कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं देखील ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

“नितेशजी पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू. कारण आपण आलो की पोलीसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू”, असं लाड म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2021 9:15 am

Web Title: shivsena gulabrao patil slams bjp prasad lad on shivsena bhavan controversial statement pmw 88
टॅग : Bjp,Shiv Sena
Next Stories
1 “शिवसेना प्रमुखांबद्दल आदर, असं विधान केलंच नाही”, शिवसेना भवनाबाबतच्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांची सारवासारव!
2 मानसिक स्वास्थ्य हरपलेल्यांना ‘सुजीवन’ 
3 विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शताब्दीनिमित्त आज व्याख्यान
Just Now!
X