शिवसैनिक नितीन नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. नितीन नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नितीन नांदगावकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेचे डॅशिंग नेते अशी नितीन नांदगावकर यांची ओळख आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ते मनसेत होते. मनसेतून त्यांनी ऑगस्ट महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात आता नितीन नांदगावकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आज सकाळी ११ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास त्यांना फोनवरुन धमकी देण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली असंही त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.

 

 

काय म्हटलं आहे नितीन नांदगावकर यांनी?
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ जुलै रोजी मी शिवसेनेच्या वतीने हिरानंदानी हॉस्पिटल येथे जाऊन रिक्षा चालक करोना रुग्णाचे बिल कमी होणेबाबत आणि मृतदेह ताब्यात मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यास गेलो होतो. त्यावेळी तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांशी माझा वाद झाला होता. सदर हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चटर्जी यांना जाब विचारला असता त्यांनी मला दम देत सांगितले की आठ लाख भरा व मृतदेह घेऊन जा. पण मी त्यांना एकही रुपया भरणार नाही व मृतदेह घेऊन जाणार नाही असे सांगून रिक्षा चालकाचा मृतदेह घेऊन आलो. त्यावेळी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्या अंगावर धावून येण्याचाही प्रयत्न केला. यानंतर आज म्हणजेच २० जुलै रोजी सकाळी ११.१७ च्या सुमारास माझ्या मोबाइलवर ९९६७१९९३३३ या क्रमांकावरुन फोन आला आणि मला शिव्या देण्यात आला. तुम्हारे साथ क्या होगा समझ जाओगे अशीही धमकी देण्यात आली. असे नितीन नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नितीन नांदगावकर हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आधीही त्यांनी इतर अनेक प्रकरणे त्यांच्या खास स्टाईलने मार्गी लावले आहेत. मात्र या प्रकरणात धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.