अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रविवारी ते अमेरिकेमधून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. ट्रम्प यांनीच त्यांच्या ट्विटरवरुन व्हाइट हाऊससमोरून हॅलिकॉप्टरमधून उड्डाण करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सकाळी दहाच्या सुमारास अहमदाबादला रवाना झाले असून ते ट्रम्प यांचे स्वागत करणार आहेत. मात्र या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी तर या दौऱ्यावर टीका करताना थेट शिवथाळीचा उल्लेख केला आहे.

काय म्हणाले राऊत?

राऊत यांना ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “देशाच्या राजकारणात केवळ एकाच गोष्टीची चर्चा असून ती गोष्ट म्हणजे शिवथाळी. या शिवथाळीचं संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही पुढे बोलताना राऊत यांनी, “ट्रम्प मुंबईत आले असते तर त्यांनीही शिवथाळीची चव चाखली असती. राहुल शेवाळेंनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची थाळी या कार्यक्रमाला ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने रांगेत उभं राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता,” असा टोलाही लागावला आहे.

आणखी वाचा – ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर शिवसेनेची टीका

पवार आणि मनसेचेही टिका

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना या दौऱ्यासंदर्भात खोचक टोला लगावला होता. “पाच वर्षांपासून म्हणजेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून परदेशातील महत्वाचे नेते अहमदाबादमध्येच जाताना दिसत आहेत. आधी परदेशातील मोठे नेते यायचे तेव्हा ते दिल्ली, मुंबई, आग्रा, हैदराबादसारख्या शहरांमध्ये जायचे. मात्र आता मोदींना केवळ अहमदाबादच दाखवावस वाटतं आहे याचा आनंद आहे,” असा टोला पवारांनी मोदींना लगावला. तर मनसेनेही यापूर्वी ट्रम्प यांना अहमदाबादमध्ये काय न्यायचे? असा सवाल उपस्थित केला होता. ट्रम्प हे भारताला भेट देणारे सातवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील तर मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातला जाणारे १६ वे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुख ठरतील.