शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

“या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

…तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा

“मला अनेकांनी नोटीस आली का विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला, पाच वेळा चहा घेतला, जेवण केलं; प्रताप सरनाईकांचा खुलासा

“देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फाशी दिली तरी स्वीकारायची तयारी, पण तोंड बंद करणार नाही – प्रताप सरनाईक

“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फडणवीसांनी काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “कोणी चौकशीला घाबरत नाही. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे विसरु नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे लवकरच कळेल”.