18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

नारायण राणेंविरोधात शिवसेनेचे मुंबईत वादग्रस्त पोस्टर

शिवसेनेच्या पोस्टरमुळे नवा वाद रंगण्याची चिन्हे

मुंबई | Updated: September 25, 2017 6:52 PM

मुंबईतील वरळी नाक्यावर लावण्यात आलेले पोस्टर

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली दिसत नाही उलट झोंबल्याचेच जाणवते आहे, कारण नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेने मुंबईतील वरळी भागात एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये नारायण राणेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.

‘इच्छा माझी पुरी करा’ या शीर्षकाखाली नारायण राणे यांच्या विरोधातील पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली आहे. राणेंविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भाषेची सगळी पातळी सोडण्यात आली आहे. या पोस्टरचे फोटो सध्याच्या घडीला सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला त्यावेळीही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून नारायण राणेंवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका करण्यात आली होती. मात्र ते राजकीय व्यंगचित्र होते. वरळीत लावण्यात आलेले पोस्टर हे राजकीय व्यंगचित्र म्हणता येणार नाही. खरेतर नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत म्हटल्यावर शिवसेनेकडून सुरूवातीला कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र या पोस्टरची मुंबईत चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढेच नाही तर नारायण राणेंनी भाजप प्रवेश केलाच तर हा पोस्टर वाद आणखी चिघळण्याचीही शक्यता आहे.

नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिक त्यांच्या परिने राग व्यक्त करत असतात. ‘गद्दार’, ‘नारोबा’ ही आणि  अशी अनेक शेलकी विशेषणे लावूनही नारायण राणेंवर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र या सगळ्याचा कळस या नव्या पोस्टरने गाठला आहे.

First Published on September 25, 2017 6:37 pm

Web Title: shivsena make poster against narayan rane in mumbai