विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणाऱया शिवसेनेला विधानसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून उपसभापतीपद शिवसेनेला देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळेच शिवसेनेच्या विधान परिषद सभापतीपदाच्या उमेदवार नीलम गोऱहे यांनी ऐनवेळी सभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.
विधान परिषदेच्या सभापतीपदी शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्ष यांनीही उमेदवार दिले होते. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर शरद रणपिसे (कॉंग्रेस), नीलम गोऱहे (शिवसेना) आणि श्रीकांत देशपांडे (अपक्ष) यांनी माघार घेतली. त्यामुळे रामराजे निंबाळकर यांची एकमताने निवड झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उपसभापतीपदी भाजपच्या नेत्याची निवड होण्याच्या वाटाघाटी या दोन्ही पक्षांमध्ये झाल्या आहेत. त्यात ऐनवेळी शिवसेनेने सभापतीपदी उमेदवार दिल्यामुळे भाजपची कोंडी झाली होती. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये विधानसभेचे उपसभापतीपद शिवसेनेला देण्याचे ठरविण्यात आले असल्याचे समजते. यामुळेच शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेतली.