शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधून आलेल्या ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्याने प्रकरण चांगलंच तापलं होतं.

टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स जारी करून चौकशीस बोलावलं होतं. ईडीने सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध केली होती. तसंच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही केली होती. .

ईडीने प्रताप सरनाईक यांना तीन वेळा समन्स बजावला होता. पदेशातून आल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक विलगीकरणात होते. यामुळे त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

दरम्यान छाप्यांनंतर ईडीने सरनाईक आणि टॉप्स ग्रुपचे प्रमुख राहुल नंदा यांच्याशी संबंधीत अमित चांदोले या व्यक्तीला अटक केली होती. टॉप्स ग्रुप कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा केला. या घोटाळ्यातील निम्मा वाटा किंवा नफा सरनाईक यांना मिळाला, अशी माहिती चांदोले याने चौकशीदरम्यान दिल्याचा दावा ईडीने केला आहे.