ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर सुमारे आठ ते नऊ तासांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने ही कारवाई नेमकी का केली याची मला माहिती नाही. मी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढणार आहे असं प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनाही ताब्यात घेतलं. आता प्रताप सरनाईक यांनी ही कारवाई का झाली तेच माहित नसल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. प्रताप सरनाईक यांच्या मुलालाही ईडीने ताब्यात घेतलं. या कारवाईच्या वेळी प्रताप सरनाईक हे घरी नव्हते. त्यानंतर सुमारे ८ ते ९ तासांनी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सामनाचं कार्यालय गाठत संजय राऊत यांची भेट घेतली. त्याआधी हे नक्की काय प्रकरण आहे? ईडीने आम्हाला कशाला बोलावलं आहे ? ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे ते आपल्याला माहित नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरावर झालेल्या ईडी कारवाईबाबत काय म्हणाले शरद पवार?

“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,”

दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची छापेमारी होताच शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्येही शाब्दिक युद्ध रंगलेलं दिवसभर पाहण्यास मिळालं. या सगळ्या कारवाईबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना ही कारवाई नेमकी का झाली तेच माहित नसल्याचं म्हटलं आहे. तसंच सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही स्पष्ट केलंय.