नेते-कार्यकर्त्यांची यादी सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

बेकायदा फलकबाजी केल्याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार व आमदार पराग अळवणी यांच्यासह १२ भाजप कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारीच दंड आकारला होता. त्यानंतरही शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्रास बेकायदा फलकबाजी केल्याची बाब सोमवारी उच्च न्यायालयासमोर आली. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या कार्यकर्ते-नेत्यांवर अवमान कारवाईचे संकेत देत त्यांची नावे व पत्त्यांची यादी शुक्रवारी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही राजकीय नेते-कार्यकर्त्यांतर्फे सर्रास बेकायदा फलकबाजी काही थांबलेली नाही, असा आरोप करीत ‘सुस्वराज्य संस्थे’च्या वतीने अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांनी त्याची छायाचित्रेच सोमवारच्या सुनावणीत न्यायालयात सादर केली. ही छायाचित्रे कुठल्या पक्षाची आणि कुठे लावण्यात आली आहेत याचा तपशीलही त्यांनी न्यायालयात सादर केला. बहुतांशी छायाचित्रेही ही मुंबई आणि पुण्यातील आहेत. तसेच ही बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांमध्ये शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.

मातोश्रीसमोरील बेकायदा फलक, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या फलकबाजीसह वरळी नाका येथील शिवसेनेचे रवींद्र मयेकर, दशरथ नितनवरे, सातरस्ता येथील शिवसेनेच्या रमेश कसबे, लक्ष्मी सावंत, मंगेश कुपेकर, सुजित अधिकारी, कलानगर- मातोश्रीसमोर शिवसेनेचे संतोष कासले, दादरच्या रानडे रोडवरील मनसेचे संदीप देशपांडे, वांद्रे येथील एमआयजीजवळील मनसेचे सुनील हर्षे, दादरच्या दादासाहेब फाळके रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदभाई परमार आदींचा समावेश आहे. तर पुण्यातील अ‍ॅड्. राहुल म्हस्के यांच्या बेकायदा फलकबाजीचा समावेश आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने या सगळ्याची गंभीर दखल घेतली. तसेच या फलकांवर ज्यांची छायाचित्रे आहेत त्यांची नावे आणि पत्ते यांची यादी शुक्रवारी सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या सगळ्यांना अवमान नोटीस बजावण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तर या सगळ्यांवर तातडीने कारवाई करू, असे पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.

‘बेटी बचाव’च्या नावाखाली हळदी-कुंकूची फलकबाजी

विशेष म्हणजे भाजपच्या नगरसेविका राजश्री पालांडे-सुर्वे यांनी चेंबूर येथील शिवाजी पुतळा परिसरात ‘बेटी बचाव’च्या शीर्षकाखाली थेट हळदी-कुंकूचे निमंत्रण देणारी बेकायदा फलकबाजी केली आहे. याचे छायाचित्रही या वेळेस न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करीत या नगरसेविकेचेही नाव आणि पत्ता अवमान कारवाईसाठी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.