News Flash

“नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत”

शिवसेना खासदार संजय राऊत यांची रोखठोक टीका

संग्रहित छायाचित्र (PTI)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला. उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी काय म्हटले आहेत संजय राऊत?

कंगना रणौतने जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्यं केलं तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते की यापुढे तिने अशी वक्तव्यं केली तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग आज हाथरस प्रकरणात शांत बसला आहे. हाथरच्या बालात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहचू शकला नाही हा प्रकारच धक्कादायक आहे. २९ सप्टेंबरला हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरु झाले होते. दिल्लीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या हाथरसमध्ये पोलिसांनी चुपचाप पीडित मुलीची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अँब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच मुलीच्या आईने स्वतःला अँब्युलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय आणि अमानुषता कशासाठी? हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमिची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमिवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळे त्याच उत्तर प्रदेशात घडले जिथे भाजपाचे सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 7:50 am

Web Title: shivsena mp sanjay raut criticized bjp and modi government on hathras issue scj 81
Next Stories
1 विद्यापीठाचा परीक्षा घोळ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
2 Coronavirus : मुंबईत करोनाचे आणखी २४०२ रुग्ण, ४६ मृत्यू
3 सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : रणबीर, अर्जुन रामपाल, डिनो मोरियाला गोवण्यासाठी दबाव
Just Now!
X