News Flash

“जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधानांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी वन टू वन चर्चा केली अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मात्र, या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता, “जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. “जर चर्चा सुरू झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची होती”, असं देखील राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक!

“जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. आणि चर्चा सुरू झाली असली, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अजित पवार, अशोक चव्हाण दिल्लीला पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेले. मराठा आरक्षणाचा मुख्य मुद्दा आहेच. पण इतरही अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं मला सांगण्यात आलं. ते तासभर सगळ्यांना भेटले. त्यानंतर अर्धा तास वन टू वन अशी चर्चा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या दरम्यान झाली आहे. या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

ठाकरे परिवार-मोदींचे जुने संबंध!

दरम्यान, आधी तासभर सगळ्यांची चर्चा केल्यानंतर पुन्हा अर्धा तास पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी वन टू वन चर्चा केली. या बंद दाराआड झालेल्या चर्चेविषयी महाराष्ट्रात राजकीय तर्क-वितर्क काढले जाऊ लागले आहेत. त्यासंदर्भात देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत, त्यांना काढू देत. नरेंद्र मोदींविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. ठाकरे परिवार आणि मोदींचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनात किती आदर आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हीही नेहमीच त्यांचा आदर केला आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “नवीन सत्तासमीकरणांचा विषय इथे येत नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केंद्र सरकार राज्यांचं पालक म्हणून काम करत असतं. राज्यांच्या संकटकाळात केंद्रानं, पंतप्रधानांनी मदत करावी ही राज्यांची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा, ही भूमिका आमची कायम राहिली आहे”, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी केलं मोठं विधान, म्हणाले….

संघर्ष कायम नसतो, केव्हातरी…!

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेल्या संघर्षाविषयी देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. “संघर्ष कायम नसतो. केव्हातरी संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. आज जर पंतप्रधानांनी तासभर महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतले आहेत, तर संघर्षाची भाषा कशाला. संवाद वाढतोय आणि तो वाढत राहावा”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 4:33 pm

Web Title: shivsena mp sanjay raut reaction on uddhav thackeray meet pm narendra modi pmw 88
Next Stories
1 Rain in Mumbai : मंबईत मान्सूनच्या सरी बरसणार! कुलाबा वेधशाळेनं दिली आनंदाची बातमी!
2 “…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट!
3 आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर
Just Now!
X