महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अन एडिटेडच असेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचा नावलौकिक होतो आहे. तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे” असं सांगताना संजय राऊत यांनी सामनातील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं. याआधी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये जेव्हा भेट झाली तेव्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल अशीही चर्चा तेव्हा रंगली होती. मात्र ही भेट मुलाखतीसाठी होती असं समजलं तेव्हा विविध चर्चांचा धुरळा खाली बसला. दरम्यान सामनासाठी जी मुलाखत घेतली जाईल ती अन एडिटेड अर्थात कात्री न लावता जशीच्या तशी दाखवण्यात यावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी घेतलेल्या मुलाखती या अन एडिटेडच असतात. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतही अन एडिटेडच असणार आहे.

“जेव्हा दोन शास्त्रज्ञ भेटतात तेव्हा ते त्यांच्या क्षेत्रावर चर्चा करतात, डॉक्टर भेटतात तेव्हा ते वैद्यकीय क्षेत्रात काय सुरु आहे यावर चर्चा करतात. जेव्हा दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते राजकीय क्षेत्रावर बोलतात. आम्ही भेटत नाही असं वाटत असेल तर त्याला काही पर्याय नाही. पण असे भूकंप वैगेरै काही होत नाहीत,” असं संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर बोलताना सांगितलं. “चंद्रकांत पाटील म्हणालेत पहाटे भूकंप होईल. आता त्यांनी गजर वैगेरे लावला असेल तर मला माहिती नाही,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “पाच वर्ष काही काम नसल्याने आमच्या भेटीने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत,” असंही ते म्हणाले.