News Flash

रक्तदान करा आणि मिळवा एक किलो चिकन मोफत, शिवसेनेची भन्नाट ऑफर

मुंबईतल्या प्रभादेवीत रक्तदानाच्या बदल्यात चिकन आणि पनीरची चर्चा

लोकसत्ता प्रतिनिधी
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राजकीय नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून निरनिराळ्या भेटवस्तू देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न नेते मंडळींनी चालविले आहेत. तर प्रभादेवीमध्ये रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना कोंबडीचे एक किलो मांस, तर शाकाहारींना पनीर देण्यात येणार आहे. प्रभादेवीत सध्या कोंबडीचे मांस आणि पनीरची जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. करोनाच्या संसर्गामुळे नागरिक रक्तदान करण्यास राजी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच रक्तदानापूर्वी करोना चाचणी करण्यात येत असून त्यात बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यास विलगीकरणात जावे लागेल अशी भीतीही नागरिकांच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे बहुसंख्य मंडळी रक्तदान करण्यास तयार होत नाहीत.

रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी नागरिकांच्या मनातील भीती ओळखून रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे. भेटवस्तूच्या निमित्ताने रक्तदाते मिळतील असे आयोजकांना वाटत आहे. शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी माहीम – वरळी विधानसभा क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबीर न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात पार पडणार आहे.

मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी मांसाहारी रक्तदात्याला कोंबडीचे एक किलो मांस, तर शाकाहारी रक्तदात्याला पनीर देण्यात येणार असल्याचे फलक प्रभादेवी परिसरात झळकविण्यात आले आहेत. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरिकांना प्रभादेवी येथील शिवसेना शाखा क्रमांक १९४ मध्ये ११ डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी लागणार आहे. महा रक्तदान शिबिराच्या निमित्ताने प्रभादेवीमध्ये सध्या चिकन आणि पनीर हा चर्चेचा विषय बनला आहे.

रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांना काही तरी भेटवस्तू दिली जाते. रक्तदात्याच्या आरोग्यासाठी एखादी चांगली वस्तू वा पदार्थ देण्याची कल्पना सुचली. त्यामुळे मांसाहारी रक्तदात्याला कोंबडीचे मांस, तर शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे समाधान सरवणकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 10:15 pm

Web Title: shivsena offer free chicken and paneer to blood donars in prabhadevi scj 81
Next Stories
1 अन्वय नाईक प्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णब गोस्वामींची पुन्हा हायकोर्टात धाव
2 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या मोबदल्यापासून ७० हजार ‘आशा’ अद्यापि वंचित!
3 मुंबई महानगरपालिकेवरही भाजपचाच भगवा फडकणार याचा विश्वास : राम कदम
Just Now!
X