News Flash

नोटाबंदीमुळे सार्‍या देशालाच ‘शहीद’ घोषित करण्याची वेळ येऊ नये- शिवसेना

नोटाबंदीचा हल्ला स्वराज्यातील राज्यकर्त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी ५० दिवस त्रास सहन करा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या भाजपवर शिवसेनेकडून पुन्हा एकदा आसूड ओढण्यात आले आहेत. नोटाबंदीमुळे दूरगामी दुष्परिणाम घडणार आहेत. त्यामुळे महागाई, मंदी, बेरोजगारीने चाळीसचे चाळीस लाख झाले तरी सरकार म्हणेल हे देशभक्तीचे बळी आहेत. अशाने एक दिवस सार्‍या देशालाच ‘शहीद’ घोषित करण्याची वेळ येऊ नये, असा खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

कश्मीरातील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात जेवढे जवान शहीद झाले त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू नोटाबंदीमुळे झाला आहे, असे विधान काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. या विधानामुळे शहीदांचा अपमान झाला असे सांगत भाजपने सभागृहात प्रचंड गोंधळ घातला होता. व्यंकय्या नायडू यांनी आझाद यांच्या माफीची मागणीही केली होती. मात्र, आझादांच्या माफीने सत्य बदलणार आहे काय?, असा प्रतिसवाल सेनेकडून अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एरवी काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडविणाऱ्या सेनेने आझाद यांना संवेदनशील आणि राष्ट्रभक्त संबोधले आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये सामील होणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घेऊन केलेली बोलणी निष्फळ ठरल्याचेही दिसत आहे.

‘नोटा’बंदीच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे चाळीस शूरवीर देशभक्तांनी बलिदान दिले आहे. फरक फक्त हल्लेखोरांत आहे. उरीत पाकड्यांचा हल्ला झाला व नोटाबंदीचा हल्ला स्वराज्यातील राज्यकर्त्यांनी केला. उरीत मारले गेले ते जवान जितके शहीद तितकेच हे ४० बलिदानी मोलाचे नाहीत काय? पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व भाजपचे लहान-मोठे पुढारी जनतेच्या तोंडास फेस येईपर्यंत एकच शौर्यगीत गात आहेत ते म्हणजे, ‘‘नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राइक सहन करून जे लाखो लोक भिकार्‍यासारखे बँकांच्या रांगेत उभे आहेत तेच खरे देशभक्त. उरीत २० जवान शहीद झाले व नोटाबंदीच्या रांगेत ‘अब तक ४०’ योद्धे बलिदानाच्या वेदीवर चढले आहेत. त्या प्रत्येकाच्या कुटुंबास किमान पन्नास लाखांची मदत सरकारने जाहीरच करावी व जे सव्वाशे कोटी लोक रोज ‘नोटाबंदी’च्या रांगेत लढत आहेत त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन सुवर्णपट (ताम्रपट नव्हे) व तहहयात पेन्शनचा लाभ मिळू द्यावा, असा खोचक सल्लाही सेनेने या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 8:28 am

Web Title: shivsena once again criticize bjp move of demonetisation
Next Stories
1 बेकायदा बांधकाम नियमित करण्यास परवानगी दिली नाही
2 इमारत आराखडय़ाला एकाच वेळी मंजुरी द्यावी लागणार!
3 मल्याप्रमाणे कर्जमाफी द्या!
Just Now!
X