किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला विरोध करणारा ठराव बुधवारी लोकसभेत फेटाळण्यात आला असला तरी एकाही विदेशी कंपनीला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशरा शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अनंत गिते यांनी दिला आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एफडीआयचे स्वागत केले आहे.
एफडीआयच्या मुद्दय़ावरून गेले काही महिने भाजप, शिवसेनेसह अनेक पक्षांनी वातावरण तापविले होते. एफडीआय आल्यास देशातील लक्षावधी छोटे शेतकरी व दुकानदार देशोधडीला लागतील, असा जोरदार प्रचार या पक्षांनी केला. लोकसभेत या विषयावरील मतदानात विरोधी पक्षांना बहुमत मिळू शकले शकले नाही. मात्र ‘इंडिया गेटवर’ सरकारने एफडीआयचे स्वागत केले तरी मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या आत विदेशी कंपन्यांना शिवसेना पायही ठेवू देणार नाही, असा अनंत गीते यांनी दिला. देशातील २१ राज्यांनी एफडीआयबाबत आपली भूमिका मांडली असून ११ राज्यांनी पाठिंबा दिला तर सात राज्यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एफडीआयला विरोध करण्याची भूमिका घेतली तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एफडीआयचे जोरदार समर्थन केले आहे. कोकाकोला पित विरोध करणाऱ्यांच्या विरोधाला काहीही किंमत नसल्याचा टोला त्यांनी हाणला होता. महाराष्ट्रात ‘एफडीआय’ला सर्वशक्तीनीशी पाठिंबा दिला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती.