राज्य शासनाने जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणापासून महाराष्ट्राला परमेश्वरा वाचव, अशा शब्दांत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी औद्योगिक धोरणावर टीका केली आहे. यापूर्वी औद्योगिक धोरण जाहीर होण्यापूर्वी त्याच्यावर जाहीर चर्चा होत होती मात्र कोणालाही विश्वासत न घेताच हे धोरण जाहीर केल्याचेही जोशी म्हणाले.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात परदेशी गुंतवणूक येत असल्याच्या लाखोंनी रोजगार उपलब्ध होणार असल्याच्या घोषणा शासनाकडून करण्यात येत होत्या. प्रत्यक्षात सेझपासून लघुउद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात आनंदी आनंद असल्याचे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. उद्योगमंत्री नारायण राणे हे या धोरणाचे कितीही गोडवे गात असले तरी बिल्डरांच्या भल्याचेच काम या उद्योग धोरणात होणार असल्याची टीका सेनेकडून करण्यात येत आहे. उद्योग धोरण जाहीर करताना पायाभूत सुविधांची काय व्यवस्था आहे. ग्रामीण भागात उद्योग नेण्याच्या बाता नारायण राणे मारत असले ती विजेचे काय करणार याचे उत्तर आज सरकारकडे नाही. राज्यातील एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजगांचे पायाभूत सुविधांअभावी हाल होत आहेत. चांगले रस्ते नाहीत की पुरेशी वीज नाही, अशावेळी लाखो कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येणार कसे असा सवालही सेनेच्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. हे उद्योग धोरण म्हणजे घरबांधणी उद्योग धोरण असल्याची टीकाही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे. या उद्योग धोरणापासून आता परमेश्वरच वाचवू शकतो अशा शब्दात मनोहर जोशी यांनी खिल्ली उडवली.