शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणातणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होतं दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्याच्या कार्यक्रमाचे. चांगल्या कामासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहीन, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्यांना योग्य तो संदेश दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी या कार्यक्रमाला येणार का, असा प्रश्न मला विचारण्यात आला. त्यावेळीच मी कार्यक्रमाला जाणार असल्याचे स्पष्ट केले. मी इथे अपशकून करायला आलेलो नाही. चांगल्या कामाच्या पाठिशी आम्ही निश्चितच आहोत. गरज पडली तर तुमच्या खांद्याला खांद लावून उभा राहीन, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या रोपट्याला मी माती आणि खत घातले आहे. हे रोपटे आम्ही वटवृक्षामध्ये परिवर्तित करू आणि संपूर्ण महाराष्ट्र हरित करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, राज्याचे वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे कौतुक केले असून, राज्यातील सर्वांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.