पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त करुन मोदी सरकारने थांबू नये. पाकिस्तानसारख्या सापाला अर्धवट मारु नये. या विंचवाची फक्त नांगी मोडली तर ते डंख मारतच राहतील. आता त्यांना संपूर्णपणे ठेचूनच थांबा असे शिवसेनेने म्हटले आहे. भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिले तर ते इस्लामाबाद, लाहोरमध्येही तिंरगा फडकवतील असा दावा शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भारतीय लष्कराच्या कारवाईचे आणि मोदी सरकारचे भरभरुन कौतुक करण्यात आले आहे. पठाणकोट आणि उरी हल्ल्यातील जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार का असा प्रश्न देशाला सतावत होता. पण मोदी सरकारने सैन्याला मोकळीक दिली आणि देशाच्या शूर जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. या जवानांला सलाम असे सांगत सैन्याच्या जवानांचे कौतुक करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधील हिंसाचारामागे पाकिस्तानचाच हात होता. आपले कोण वाकडे करणार नाही अशी मुजोरवृत्ती पाकिस्तानमध्ये होती. त्यांचा हा मस्तवालपणा आधीच मोडून काढला पाहिजे होता असे अग्रलेखात म्हटले आहे.
पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा कारखाना आहे. भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात प्रगती करत असताना पाकिस्तान भारत द्वेषाच्या प्राणवायूवर जगत होता. भारताच्या प्रगतीने पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले. तीन युद्धात त्यांची जिरली नाही असे टीकास्त्र सेनेने सोडले.  भारतीय सैन्याचे पुढचे पाऊल आता पाकिस्तानच्या छातीवर पडले पाहिजे. सरकारने सैन्याला स्वातंत्र्य दिले तर भारताचे जवान इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमध्येही तिरंगा फडकवतील असा दावाच शिवसेनेने केला.  पाकिस्तानसोबत आता चहापान नाही. यापुढे त्यांच्यासोबत क्रिकेट सामने खेळायचे नाहीत. तसेच संगीत कार्यक्रमांचे आयोजनही करायचे नाही अशी तंबीच शिवसेनेने दिली आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देणार याचे भान केंद्र सरकारने ठेवले पाहिजे असा सावधानतेचा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.