उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं असून ते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही, असं स्पष्ट दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार असून यासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि झाल्यावरही गेले. उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमी जातात. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, ते राजकारण म्हणून नाही. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम आहे. राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्त्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केलं आणि ते कायम राहील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनासाठी पवारांच्या NOC ची गरज नसावी”

भूमिपूजन निमंत्रणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “राम जन्मभूमी न्यास यांच्या ताब्यात असून त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिलं आहे. आता किती लोक बोलवणार आहेत, सोशल डिस्टन्सिंग, राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळणार आहेत यावर ते अवलंबून आहे”.

आणखी वाचा- राम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना टोला

शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “करोनाची लढाई पांढऱ्या कपड्यातील देवदूत लढत आहेत. उद्धव ठाकरेंनी याआधी सांगितलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कबुली दिली आहे देशातील लाखो डॉक्टर, पोलीस, नर्स, वॉर्डबॉय अशा सगळ्यांचं करोनाशी लढताना बलिदन झालं आहे. ही लढाई देवाच्या आशिर्वादाने तेच लढतील”.