देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्यात यावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अनेक राज्यांमध्ये आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम होते, ती लपवाछपवी आता बंद झाली आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी रेमडेसिवीवरुन राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“एखाद्या मोठ्या युद्धात बॉम्बमुळे जसं सगळं उद्ध्वस्त होतं तसं सगळं उद्ध्वस्त होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये आकडे लपवण्याचे जे कार्यक्रम होते.. ती लपवाछपवी आता बंद झाली आहे. त्याचाही स्फोट झाल्याने आता जागोजागी अनेक राज्यांमध्ये चिता भडकलेल्या दिसत आहेत. रस्त्यांवर रुग्ण दिसत असून जर हे प्रकरण वाढत गेलं, नियंत्रण ठेवलं नाही आणि पुन्हा पुन्हा परिस्थिती लपवत राहिलो तर देशात अराजक माजेल असं चित्र स्पष्ट दिसत आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा – संजय राऊत

“प्रत्येक राज्यात काय चाललं आहे? देशाची परिस्थिती काय आहे? सरकार काय करत आहे? राज्यांना काय मदत आवश्यक आहे? देशाची आर्थिक, आरोग्य स्थिती काय आहे? याविषयी सोशल डिस्टन्सिंग पाळून एक विशेष अधिवेश बोलावणं गरजेचं आहे. देशाची परिस्थिती गंभीर असल्याचं सर्वांनी मान्य केलं आहे. देशाच्या संकटावर चर्चा होणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, “विरोधी पक्षाने मुख्यंमंत्र्यांसोबत चर्चा केली पाहिजे. जर त्यांच्याकडे काही माहिती असेल आणि ते सरकारला डावलून रेमडेसिवीर मिळवू शकत असतील तर ते राज्यासाठी मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं”. चौकशीसंदर्भात विचारण्यात आलं असता जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे संकेत दिले असल्याचं ते म्हणाले.

अमित शाह यांनी घाईत लॉकडान घेण्याची गरज नाही असं वक्तव्य केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रचार करुन ते आता दिल्लीत आले असतील. जर त्यांना घाईत लॉकडाउन करण्याची गरज नाही असं वाटत असेल तर जी माणसं मरत आहेत, ऑक्सिजन तसंच बेडशिवाय तडफडत आहेत… त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना असतील तर जाहीर कराव्यात”.