News Flash

“काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय”, संजय राऊतांचा नितेश राणेंना खोचक टोला

संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना काहींना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

sanjay raut on nitesh rane
संजय राऊत यांची नितेश राणे यांच्यावर खोचक प्रतिक्रिया

मुंबईच्या माहीममध्ये शनिवारी भाजपाच्या विधानसभा कार्यालयाबाहेर पक्षाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे हे दोघे उपस्थित होते. यावेळी प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असताना दुसरीकडे नितेश राणेंनी केलेल्या टीकेचा देखील शिवसेनेनं समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंनी केलेल्या विधानावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या…

संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितेश राणेंनी केलेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे”, अशी टीका नितेश राणेंनी केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच संजय राऊतांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी वाचलं कुठेतरी. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील. हा शाखाप्रमुखांच्या स्तरावरचा विषय आहे. कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना भवनाविषयी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतर लागलीच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून खोचक शब्दांमध्ये एक सूचक ट्वीट केलं आहे. प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्याबाबत प्रतिक्रिया देणं टाळून शाखाप्रमुख बोलतील, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दोघांवर देखील निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

“महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालों को इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचं ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसं समजणार?” असं या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत.

प्रसाद लाड यांची दिलगिरी!

दरम्यान, शनिवारी “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ जारी केला आहे. “शिवसेना प्रमुख किंवा त्यांनी बांधलेल्या वास्तूचा मला अनादर करायचा नव्हता. कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”, असं प्रसाद लाड या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2021 11:21 am

Web Title: shivsena sanjay raut mocks bjp nitesh rane on shivsena bhavan statement pmw 88
Next Stories
1 घरातूनच घ्यावं लागणार लालबागच्या राजाचं दर्शन; मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय
2 शिवसेना भवनाविषयी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 “तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही…”, शिवसेनेनं प्रसाद लाड यांना सुनावलं!
Just Now!
X