सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमी राजकीय कलगीतुरा रंगताना दिसत असतो. पण राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. आणि तो रंगतोय स्वबळावरून! काँग्रेस राज्यात करत असलेल्या स्वबळाच्या भाषेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांमध्ये फटकारलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला खोचक सल्ला देत त्यांच्या स्वबळाच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. “त्यांनी आधी पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

“एक नेता स्वबळ म्हणतो, दुसरा ती भूमिका नाही म्हणतो!”

संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खोचक टोमणा मारला आहे. “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं. आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार”, असं जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी पाटील यांनी याबाबत ठाम भूमिका मांडण्याचं टाळलं होतं.

What Sharad Pawar Said About Modi?
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य

शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार!

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना कोणत्याही प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे सूतोवाच केले. “उद्धव ठाकरेंनी काल राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना जी दिशा दिली, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार आहे. बळावर वा स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे हा काँग्रेससाठी अप्रत्यक्ष इशारा असल्याचं मानलं जात आहे.

“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल; पण…”, संजय राऊतांनी सांगितली आठवण!

“राज्याच राजकीय शांतता नांदायची असेल, तर…”

रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी इतरही राजकीय पक्षांना इशारेवजा सल्ला दिला आहे. “अंगावर याल तर शिंगावर घेऊ हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कुणाच्या वाट्याला जात नाही. शिवसेनाही कुणाच्या वाट्याला जात नाही. आणि कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे राज्यात तर राजकीय शांतता नांदायची असेल, तर प्रत्येकानं आपापली जबाबदारी आणि कर्तव्य पाळलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण आणि विरोधासाठी विरोध करू नये. या काळात राडेबाजी करणार असाल, तर लोक चपलेनं मारतील हे आपल्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगावं लागलं, यातच सगळं आलं आहे”, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना स्वबळाचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसचा कानपिचक्या दिल्या. “स्वबळ म्हणजे काय? करोना काळात देशातील, महाराष्ट्रातील नागरिक अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता लक्षात न घेता स्वबळाचा नारा दिला. आम्ही स्वबळावर आणू असं म्हटलं, तर लोक जोड्यानं हाणतील. लोक म्हणतील तुझी सत्ता तुझ्याकडे ठेव आणि माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार? हा विचार आपण केला नाही, तर आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे हे निश्चित”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “केवळ निवडणुका आणि सत्ताप्राप्ती हा विचार सर्वच राजकीय पक्षांनी बाजूला ठेऊन करोनाच्या संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार करायला हवा. ते न करता आपण विकृत राजकारण करत राहिलो, तर आपल्या देशाचं काही खरं नाही”, असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे म्हणतात…तर लोक जोड्यानं मारतील – वाचा सविस्तर

काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय!

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापाठोपाठ राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील “एकटं लढू द्या, मग बघुयात किस में कितना है दम”, असं म्हणत थेट मित्रपक्षांना आव्हानच दिलं. या पार्श्वभूमीवर सत्तेतील मित्रपक्षांमध्ये नेमकं काय चाललंय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.