सुशांत सिंहच्या कुटुंबाने संजय राऊत यांना नोटीस पाठवली असून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. वडिलांनी दुसरं लग्न केल्याने सुशांत नाराज होता असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कारवाई करु असा इशारा दिला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंबईत इतकं काम आहे. आम्हाल अशा अनेक नोटीस येत असतात असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- “…तर आधी केंद्रातलं सरकार पडेल,” सुशांत सिंह प्रकरणी संजय राऊत यांचं वक्तव्य

“कुटुंबाची काय मागणी आहे याची कल्पना नाही. जर चूक झाली असेल तर विचार करावा लागेल. जी माहिती आहे त्यावरुनच मी बोलत आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. “सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचं,” संजय राऊत यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा पुन्हा एकदा त्यांनी आरोप केला.

आणखी वाचा- ‘४८ तासात जाहीर माफी मागा, अन्यथा…,’ सुशांतच्या नातेवाईकाची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

“सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.