News Flash

“CBI च्या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी नसावी, पण जर तसं असेल तर…” देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी सकाळीच छापा टाकला!

संग्रहित (PTI)

शनिवारी सकाळीच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या गोष्टी देशभरात काही काळ थांबवायला हव्यात. किमान एक किंवा दोन महिने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी आपापलं राजकारण थांबवावं. कारण प्रत्येकाला आता कोविडशी लढण्याची गरज आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज सामनाच्या अग्रलेखातून देखील देशातील करोनासंदर्भातल्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला होता.

अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध सीबीआयने दाखल केला गुन्हा

सीबीआयला कोर्टाचे आदेश…

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी सीबीआयच्या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली. “सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”, असं राऊत म्हणाले. “सीबीआयची टीम आहे. सीबीआयचा एक अजेंडा आहे. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. कायद्याच्या वर कुणी नाही. मला वाटतं जी कारवाई सीबीआयने केली आहे, त्यावर आत्ता कशाही प्रकारचं मत व्यक्त करणं कुणासाठीही चांगलं नाही. माझ्या मते अनिल देशमुख यांनी आपलं म्हणणं सीबीआयसमोर मांडलं आहे. सीबीआय आपलं काम करत आहे. उच्च न्यायालयाने आपलं काम केलं आहे. आणि महाविकासआघाडी देखील आपलं काम करत आहे”, असं ते म्हणाले.

देशाचं नेतृत्व गंभीर नाही…!

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. “देशातल्या स्थितीचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने आरोग्यविषयक अराजकता असा केला आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी २४ तासांत एका रुग्णालयात २५ लोकांचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये स्मशानभूमीमध्ये अम्ब्युलन्सच्या रांगा लागल्या आहेत. देशाच्या नेतृत्वाने हा विषय जितका गांभीर्याने घ्यायला हवा होता, तो घेतला नाही. ते राजकारणाच्या पलीकडे पाहायला तयार नाही. यामुळे देशाची जनता नरकयातना भोगते आहे. पण आम्ही लढतो आहोत. आमचे मुख्यमंत्री कुठल्या प्रचाराला गेलेले नाहीयेत. ते राज्याच्या राजधानीत बसले असून संघर्ष करत आहेत. ते राजकारण करत नाहीयेत”, असं राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 11:10 am

Web Title: shivsena sanjay raut on cbi raid on anil deshmukh house parambir singh letter pmw 88
टॅग : Maharashtra Politics
Next Stories
1 Video : बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पिअर… दोघांत फरक काय आहे?
2 साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती करावी
3 कुशल मजुरांविना बांधकाम क्षेत्राला खीळ 
Just Now!
X