आणखी एक रात्र थंडीत काढल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे गेले ४ दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले.

“पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगासमोर आदर्श ठेवत शांततेत आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

पाहा फोटो >> अन्नदाता रस्त्यावर… थंडीमध्ये कुडकुडत आंदोलक शेतकऱ्यांनी घालवली रात्र

पुढे ते म्हणाले की, “सर्वांनीच शेतकऱ्यांना समर्थन दिलं पाहिजे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन केलं पाहिजे. शेतकऱ्यांशी तिथे जाऊन चर्चा केली पाहिजे. तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग आज दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे”.

आणखी वाचा- …तर देशाला भारी पडेल, दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा इशारा

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो अशी टीका केली आहे. त्याला उत्तर देताना म्हटलं आहे की, “चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे”. उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल”.