अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी मुंबईत पोहोचल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे अशी प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे म्हटलं.

मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…

संजय राऊत यांनी कंगना वादावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिला. कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, “महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तिथे एक कायदेशीर विभाग आहे. तुम्ही यासंबंधी महापौरांशी बोलू शकता, ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्यावर मत व्यक्त करणार नाही”. कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नावर ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कंगनाने नेमकं काय म्हटलं?
मुंबईत पोहोचताच कंगनाने व्हिडीओ शेअर केला. त्यात तिने म्हटलं की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र”.