राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना फटकारलं असून त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय विधान केल्यानेच शरद पवार यांनी राजकीय उत्तर दिलं असेल असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचा अनुभव, ज्येष्ठता पाहता मीडियाने या वादात पडू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तुम्ही कुटुंबात कलह कशासाठी निर्माण करत आहात? अशी विचारणा संजय राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केली आहे. सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे म्हटलं.

पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकऱणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरुन शरद पवारांनी ते अपरिपक्व असल्याचं सांगत फटकारलं. यावर संजय राऊत यांना शिवसेनेची काय प्रतिक्रिया आहे असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “पार्थ पवार हे पक्षाचे प्रवक्ते नाहीत, प्रमुख नेते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार प्रमुख नेते आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील काही बोलत आहेत का ? मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?”.

“शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल किंवा एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याच्यावरती मीडियानं फार चिंता करण्याचं कारण नाही. जे पवारांना ओळखतात त्यांनी शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं हे समजून घेतलं पाहिजे. शरद पवारांना जे काही बोलायचं होतं ते ते बोलले आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवारांना शरद पवारांनी फटकारलं

“नया है वह,” पार्थ पवार प्रकरणी भुजबळांची मार्मिक टिप्पणी

“त्यांच्या सर्वोच्च नेत्याने काय ते सांगितलं असल्याने तिथंच विषय संपला आहे. पार्थ पवार हे त्यांच्या कुटुंबाचे घटक आहे. पवार साहेबांनी केलेल्या विधानावर मी व्यक्त होणं योग्य नाही. अनेकदा बाळासाहेबांनीही आमचे कान उपटले आहेत. पक्षाचा सर्वोच्च नेता कोणी चुकत असेल तर कान उपटतो. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

शरद पवारांनी सीबीआय चौकशी करणार असेल तर विरोध करण्याचं कारण नाही असंही म्हटलं होतं. यावर विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, ” त्यांनी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत असून क्षमेतवर २०० टक्के विश्वास असल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्र्यांनीही तेच म्हटलं असून आम्हीही तेच सांगत आहोत. तपास व्यवस्थित सुरु असताना सीबीआयला आणणं आमचा विरोध आहे. इथे लपवायला काहीच नाही. मुंबई पोलिसांच्या तपासाव्यतिरिक्त अजून काही सीबीआयला सापडणार नाही. त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नाही”.

“आता नातवांनी आजोबांना…,” शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“सीबीआय काय वेगळा तपास करणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर काही राहिलं असं वाटत असेल तर जगातील कोणत्या संस्थेला तपास द्यावा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख होत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय प्रकरणाला सनसनाटी निर्माण होत नाही असं एक सूत्र झालं आहे. आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. पोलीस जो तपास करत आहेत त्यांना शांतपणे तपास करु देणं हे त्या प्रकरणाच्या आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीने सोयीचं आहे. न्याय हवा असेल तर सुशांतच्या कुटुंबीयांनी काही काळ शांत राहावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावं”.