व्यंकय्या नायडू यांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा देण्यावरुन उदयनराजेंना समज दिल्याने सध्या संताप व्यक्त होत असून सर्वसामान्यांसोबत राजकीय पक्षदेखील हा मुद्दा उपस्थित करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू चुकीचं वागले नाहीत असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. याआधी संजय राऊत यांनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचं प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे अशी टीका केली होती.

उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा, व्यंकय्या नायडूंनी दिली समज, म्हणाले…

उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही सांगत काँग्रेसच्या खासदाराने आक्षेप घेतल्याने त्यांनी समज दिली असं सांगितलं. यावेळी त्यांनी संजय राऊत महान व्यक्ती असल्याचा टोला लगावला. यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “कोणीही महाराजांच्या नावे राजकारण करु नये, तसंच महाराजांचा अपमानही सहन करु नये. अपमान झाल्यास महाराष्ट्र शांत बसणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. उदयनराजेंच्या भावनांशी मी सहमत आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याने मी फक्त माझं मत प्रदर्शित केलं”. “महाराष्ट्राला आणि आमच्यासारख्या छोट्या मावळ्यांना महान करण्याचं काम महाराजांनी केलं,” असं सागंत संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं.

“…तर तिथेच राजीनामा दिला असता”, व्यंकय्या नायडूंनी समज दिल्यानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

“जय भवानी जय शिवाजी घोषणा घटनाबाह्य आहे असं मला कधीच वाटलं नाही. सभागृहात जेव्हा जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आम्ही ही घोषणा दिली आहे. व्यंकय्या नायडू नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे आहेत. हा वादच नाही असं आम्हालाही वाटतं. महाराजांसंबंधी घोषणा घटनाबाह्य, नियमबाह्य नाहीत हेच मला सांगायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम इतकीच ती महत्त्वाची आहे. उद्या ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ यांच्यावरही आक्षेप घेतला जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

…म्हणून राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली २० लाख पत्रं पाठवणार

संजय राऊत यांना ट्विटमध्ये मांडण्यात आलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “शिवसेनेच्या संदर्भात जेव्हा असे काही विषय निर्माण झाले होते तेव्हा भाजपाच्या काही नेत्यांनी भूमिका व्यक्त केली होती. ती यावेळीही व्यक्त व्हायला हवी होती इतकंच माझं म्हणणं आहे. नायडू चुकीचं वागले नाहीत हे मी स्पष्टपणे सांगत आहे. त्यांच्याइतका कामकाजाचा अनुभव असलेला नेता नाही. सभागृहात आम्हीदेखील त्यांचं ऐकतो”.

“नियम आणि भावना दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महाराज आमच्या श्रद्धेचा विषय असल्याने मत व्यक्त केलं. संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय पक्षांनी ते केलं आहे. मी पक्षाचा नेते म्हणून नाही तर महाराजांचा मावळा या भूमिकेतून हे मत व्यक्त केलं आहे. उदयनराजेंनी भूमिका मांडल्याने विषय संपला आहे. जर कोणाला वाटत असेल की अपमान झाला नसेल तर ती त्यांची भूमिका आहे,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.