काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटलं की, “राहुल गांधी खासदार आहेत…सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही”.

“ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. “आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.