शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो त्याला जास्त कळतं असं विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आपल्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या अशी विचारणा त्यांनी केली आहे. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

डॉक्टर देवदूतांसारखे, मी त्यांचा अपमान केलेला नाही; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

“जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.