उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांचा साठा सापडलेल्या प्रकरणात महत्वाचा दुवा असणारे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीची मालकी मनसुख हिरेन यांच्याकडे होती. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. विधानसभेत शुक्रवारी त्यांनी सचिन वाझेंचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान सचिन वाझे यांचा शिवसेनेसोबतही संबंध जोडला जात आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

सचिन वाझे यांच्यासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सरकारला सवाल केले आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?,” असे सवाल देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
“क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे संशय निर्माण झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”.

लोकांच्या मनात शंका आहे
“जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूल असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा
“अधिवेशन सुरु असताना एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही व्यथित करत असेल. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

विधानसभेत फडणवीसांचे गंभीर आरोप
“मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्र वाचून दाखवत सांगितलं की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वाझेंना का काढलं? हे समजलं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. सचिन वाझे यांचा तो नंबर असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील”.

“ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचं रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिलं आहे. अशा परिस्थितीत वाझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वाझे तिथे पोहोचले. धमकीचं पत्रही सचिन वाझे यांना प्राप्त झालं. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकलं. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.