शरद पवार यांच्या स्वाभिमानाच्या मुद्याचा शिवसेनेने उदाहरणांसह समाचार घेतला आहे. “पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही,” अशी कोपरखळी शिवसेनेनं लगावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी पवारांनी वापरलेल्या स्वाभिमान या शब्दावर बोट ठेवले आहे. “खरे तर ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही,” असा चिमटा काढत “उदयनराजे भोसले यांनी पक्षांतर करताच म्हणजे ते भाजपात जाताच त्यांची सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी केली. पण, नवी मुंबईचे गणेश नाईक ठाण्यातील भाजप कार्यक्रमात गेले. तेथे त्यांना बसायला कुणी खुर्ची दिली नाही असे प्रसिद्ध झाले. येथे पुन्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतोच. माणसे आणि वकुब पाहून विकासकामे व स्वाभिमानाचे तुरे मिरवले जातात. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

शिवसेनेने यापूर्वी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी पवारांना निशाणा केलं होतं. “जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळय़ांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला, पण जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून  पळवणारे कोण होते?  पवारसाहेब तुम्हीच होता.  राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन  या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले,” शिवसेनेनं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena says amol kolhe is our parcel bmh
First published on: 17-09-2019 at 07:52 IST