पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींना त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शुभेच्छा देत या प्रकल्पामुळे मुंबईची लूट होऊ नये, अशी अपेक्षा शिवसेनेने ‘सामना’मधून व्यक्त केली. बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल, असे सांगणारे थापा मारत असल्याचा प्रहारदेखील शिवसेनेने केला आहे. यासोबतच बुलेट ट्रेन राष्ट्रीय गरजांमध्ये बसते का, असा सवालदेखील उपस्थित केला आहे.

‘पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगलपासून भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरपर्यंत अनेक सार्वजनिक उपक्रमांचा पाया घातला. देश तंत्रज्ञान, विज्ञानात पुढे जावा यासाठी अनेक योजनांची पायाभरणी केली. कारण ती सर्व देशाची गरज होती. १४ सप्टेंबरच्या मुहूर्तावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मोदी यांचे हे स्वप्न आहे व पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाचे स्वप्न आहे. त्यांच्या स्वप्नाला विरोध करण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही कदापि करणार नाही. कारण पंतप्रधान जे करीत आहेत ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच करीत आहेत,’ असे म्हणतानाच ‘राष्ट्रीय गरजांत जपानची अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन बसते काय?’, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

‘मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनचा साफ बोजवारा रोज उडत असला तरी आता अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून पडले आहेत. महाराष्ट्राचे आमदार-खासदार त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत मागण्या करीत आहेत. त्या तशाच अधांतरी ठेवून ‘बुलेट ट्रेन’ न मागता मिळत आहे,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर निशाणा साधला. बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या छाताडावरूनच धावणार आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मिती होईल, असा दावा पंतप्रधान मोदी आणि भाजपने केला होता. त्याचाही समाचार शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. ‘बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल, असे सांगणारे थापाच मारत आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि काम सुरू असताना जपानची कंपनी खिळ्यापासून रुळापर्यंत, खडीपासून सिमेंटपर्यंत सर्व तंत्रज्ञान त्यांच्या देशातून आणणार आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यास जपानी कंपनीने विरोध केला आहे. त्यामुळे जमीन आणि पैसा महाराष्ट्राचा व गुजरातचा; लाभ मात्र जपानचा होणार आहे,’ अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रडणाऱ्या सरकारला बुलेट ट्रेनचा खर्च परवडतो, असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. ‘बुलेट ट्रेनसाठी १ लाख ८ हजार कोटी केंद्राला खर्च करावे लागतील व महाराष्ट्राला त्यातले किमान ३० हजार कोटी रुपये नाहक द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभा केला. तेव्हा कर्जमुक्ती केली तर राज्यात अराजक माजेल आणि अराजक माजावे अशी काही लोकांची इच्छा असल्याचा गळा मुख्यमंत्र्यांनी काढला होता. मग आता पंतप्रधानांच्या ‘श्रीमंत’ स्वप्नासाठी ३० ते ५० हजार कोटी रुपये टाकत आहात. त्यामुळे अराजक माजणार नाही काय, याचे उत्तर मिळायलाच हवे,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.