04 March 2021

News Flash

सत्याचा कोंबडा आरवलाय, मनमोहन सिंगांचा सल्ला गांभीर्याने घ्या; मोदी सरकारच्या वर्मावर शिवसेनेचे बोट

आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा मनमोहन यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे.

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेही “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.” असे सांगत मोदी सरकारच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. “वाईट काळात डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची मशागत केली हे मान्य करावे लागेल. ३५ वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध आहे. त्यामुळे सध्याच्या अर्थव्यवस्थेत काही चुका दिसत असतील तर मनमोहन यांना बोलण्याचा अधिकार आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरल्याचे मनमोहन सांगत आहेत. आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय सिंग यांचा सल्ला गांभीर्याने घ्या”, असे खडेबोल शिवसेनेने सरकारला सुनावले आहे.

देशातील आर्थिक स्थिती आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेले भाष्य यावर शिवसेनेने सामना मुखपत्राच्या अग्रलेखातून मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे. “गणेशाच्या आगमनाने विघ्ने दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱ्या बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या कर्तबगारीवर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. मोदी ते करून दाखवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण अर्थव्यवस्था व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत.देशाचा विकास दर घसरला आहे, उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे व लाखो लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र हे चित्र सरकारला भयावह वाटू नये ही स्थिती धक्कादायक आहे.” असा सूचक इशारा शिवसेनेने दिला आहे.

“निर्णय चुकले व निर्णय चुकत आहेत, विचार करा, असे सांगणाऱयांना मूर्ख ठरवण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या मते सध्याची आर्थिक मंदी ही मानवनिर्मित आहे. मनमोहन सिंग यांच्या पाठोपाठ नितीन गडकरी यांचे तितकेच टोकदार वक्तव्य आले आहे. सरकार जेथे जेथे हात लावते तेथे तेथे सत्यानाश होत असल्याचा भाला गडकरी यांनी खुपसला आहे. नोटाबंदी व जीएसटी ही या सत्यानाशाची उदाहरणे आहेत. मोदी यांनी अलीकडेच सर्व मंत्र्यांना तंबी दिली की, उगाच मोठय़ा घोषणा करू नका, ज्या घोषणा पूर्ण करता येणार नाहीत त्या करू नका. याचा अर्थ घोषणाबाजी बंद करणे हाच आहे. मंदी आहे व घोषणा करून लोकांना आशेला लावू नका, पण अशा मोठय़ा घोषणांचे फटाके फोडायला सुरुवात केली कोणी? अर्थात ३७० कलम हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र कश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. कश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता येईल, पण आर्थिक मंदीवर बंदुका कशा रोखणार? मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक ‘भूक भूक’ करीत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळय़ा घालणार काय? आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा मनमोहन यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय व्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱयांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, पण देश मात्र कोसळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये व तज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारवर प्रहार केला आहे.

अर्थमंत्र्यांच्या दाव्याची भीती वाटते-
“देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामनबाईंचे कौतुक आधी झाले. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांच्यावर उधळलेली फुले अद्याप सुकलेली नाहीत, पण सक्षम महिला असणे व देशाचे अर्थकारण रुळावर आणणे यात फरक आहे. आपल्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांना आर्थिक मंदी कोठेच दिसत नाही व देशात सर्व आलबेल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आर्थिक ‘मंदी’वर त्या अनेकदा मौनच बाळगतात, पण हिंदुस्थानची अर्थव्यवस्था आजही चीन व अमेरिकेच्या तोडीची असल्याचा अफाट दावा त्या करतात तेव्हा भीती वाटते. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन इतकी बनवायचे मोदी यांचे स्वप्न आहे, पण चीनची अर्थव्यवस्था १३ ट्रिलियन इतकी आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था १५ ट्रिलियनच्या पुढे आहे व त्या तुलनेत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियनवर अडकली. त्यात आता मंदीचा मार बसत आहे. नोटाबंदी फसली व जीएसटीने व्यापारी व उद्योजकांच्या गळय़ाभोवती फास आवळला. त्यामुळे या क्षेत्रात अफरातफरी माजली आहे. आता ऑगस्ट महिन्यात जीएसटीचे कलेक्शन एक लाख कोटींपेक्षा कमी झाले आहे. हे कसले लक्षण समजायचे”, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

मनमोहन सिंगांना राष्ट्राचे अर्थकारण चांगले कळते-
“देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे, त्याचे भाकीत मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केले होते. आज जे घडत आहे ते घडणार असे ‘मि. क्लीन’ मनमोहन यांचे तळमळीचे सांगणे होते. मनमोहन सिंग यांची तेव्हा यथेच्छ टिंगल-टिवाळी करण्यात आली. ‘‘मनमोहन सिंग हे रेनकोट घालून शॉवरखाली आंघोळ करतात’’ असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी मागे केले होते. थोडक्यात, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातले काहीच कळत नाही असे नव्या राज्यकर्त्यांचे म्हणणे पडले. मनमोहन रेनकोट घालून शॉवरखाली बसतील किंवा डोक्यावर छत्री धरून तरण तलावात डुबक्या मारतील, पण त्यांना अर्थशास्त्र व राष्ट्राचे अर्थकारण कळते हे सांगायला आम्हाला संकोच वाटत नाही. देशाचेही तेच मत आहे. ३५ वर्षे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा संबंध आहे”, असे म्हणत मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 8:15 am

Web Title: shivsena support former pm manmohan singh and criticised govt bmh 90
Next Stories
1 तवा आश्रमशाळेतील  २५ विद्यार्थ्यांना काविळ
2 पतीच्या हत्येप्रकरणी महिलेला जन्मठेप
3 निष्क्रिय लोकांबरोबर राहिलो तर भविष्यात लोकच माझ्यासोबत राहणार नाहीत
Just Now!
X