राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळवारी झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय सगळ्यांशी चर्चा करुन घेण्यात आला असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सोमवारीच एनडीएने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार असतील असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केले होते. त्याला शिवसेना वगळता सगळ्या घटकपक्षांनी पाठिंबा दिला होता. शिवसेनेनेही आज पाठिंबा देऊन आपला विरोध नाही हे स्पष्ट केले आहे. रामनाथ कोविंद हे एनडीएने पुढे केलेले चांगले नाव आहे. ते देशासाठी चांगले काम करतील, देशहिताचे निर्णय घेतील अशी आशा आम्हाला आहे, शिवसेना नेत्यांशी चर्चा करुन आम्ही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

खरेतर देशहितासाठी, आम्ही मोहन भागवत यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. ही पसंती आजही कायम आहे. मात्र ते राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे म्हणून स्वामिनाथन यांच्या नावाला दुसरी पसंती दर्शवली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आम्ही स्वामिनाथन यांचे नावही सांगितले होते. मात्र स्वामिनाथन यांची प्रकृतीचे कारण असल्याने त्यांना उमेदवार करणे शक्य नाही असेही शाह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने जे तिसरे नाव जाहीर केले, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे.

कायम भाजपला विरोध करावा अशी काही शिवसेनेची भूमिका नाही. जे पटते तिथे पाठिंबा देतो आणि जे पटत नाही तिथे विरोध स्पष्टपणे करतो, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. काँग्रेस काय किंवा इतर विरोधी पक्ष काय ज्या नावांची चर्चा करते आहे, त्या फक्त चर्चाच आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यात काहीही अर्थ नाही, तोवर निवडणूक होऊन जाईल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सोमवारी झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाबाबत काहीसा नाराजीचा सूर आळवला होता. तसेच रा.लो.आ.ला या संदर्भात पाठिंबा द्यायचा की नाही हे बैठक घेऊन ठरवू असेही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यामुळेच आज काय होणार, शिवसेना विरोध करणार का? हा प्रश्न होता. मात्र उद्धव ठाकरेंनी आळवलेला नाराजीचा सूर पूर्णपणे दूर झाल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले.