भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन कान टोचल्यानंतर शिवसेना नरमेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच सेनेने पुन्हा एकदा भाजपवर जाहीर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. मात्र, आम्हाला मध्यावधीचे काय होणार यापेक्षा काश्मीरचे काय होणार?, याची जास्त चिंता असल्याचे सांगत सेनेने भाजपला खोचक टोला लगावला आहे. कालच अमित शहा यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, अमित शहा यांची पाठ वळताच सेनेने अशाप्रकारे टीका केल्याने दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळातही तणावपूर्ण संबंध राहतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

सेनेशी युती ही अपरिहार्यता नव्हे!

अमित शहा यांनी मुंबईत आल्यानंतरच मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्ही मैदानातून पळ काढणार नाही, असे सांगत शिवसेनेला अंगावर घ्यायचा इरादा स्पष्ट केला होता. याशिवाय, मातोश्रीवरच्या भेटीला फारसे राजकीय महत्त्व नसून ती ‘नित्याची बाब’ असल्याचे व शिवसेनेला किंमत देत नसल्याचे शहा यांनी सूचित केले होते. या सगळ्या घडामोडीनंतर काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी तब्बल दीड तास चर्चा केली. शिवसेनेकडून केंद्र व राज्य सरकारवर सातत्याने टीका सुरू असते. या पार्श्वभूमीवर या भेटीत अमित शहा यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला होता. सत्तेची फळे चाखायची असतील, तर विरोधी पक्षांप्रमाणे वर्तन थांबवावे, अन्यथा विरोधी पक्षात बसावे, असे अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मवाळ पवित्रा घेत शहा यांना पाच वर्षे सत्तेत राहण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजचा अग्रलेख पाहता या सर्व आशा धुळीला मिळाल्या आहेत.

कर्जमाफीच्या निर्णयानंतरही मध्यावधी निवडणुकांवर भाजप सावध

दरम्यान, उद्धव ठाकरे हे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील व शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आज, सोमवारी होणाऱ्या मेळाव्यात आपली भूमिका मांडतील, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे. तेथे मांडण्यात येणाऱ्या भूमिकेतून उद्धव ठाकरे भाजपला ‘मराठी बाणा’ दाखवतील, असे खात्रीलायक वृत्त या सूत्रांनी दिले आहे.