शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टय़ांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून लगावण्यात आला आहे. तसेच सरसकट कर्जमाफीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडेल, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांचा दावाही शिवसेनेने खोडून काढला आहे. सरसकट कर्जमाफीने अर्थव्यवस्था कोलमडेल वगैरे विचार ठिक आहेत, पण जनताच जिवंत राहिली नाही तर तुमच्या त्या अर्थव्यवस्थेस काय पालखीत बसवून मिरवायचे आहे?, असा सवाल या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

कर्जमुक्ती न झाल्यास लढाई!

दानवे यांच्यासारखे पुढारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विरोधी पक्षाकडे ‘हमी’ मागतात हा तर चेष्टेखोरीचा कळसच झाला. रावसाहेब दानवे यांच्या जिभेचे काय करायचे, असा प्रश्न आता मुख्यमंत्री फडणवीस यांनाही पडलाच असेल. रावसाहेब दानव्यांनी आता शेतकऱयांच्या दुःखावर डागण्या देत सांगितले आहे की, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या. दानवे यांच्या नव्या तोंडपट्टय़ांमुळे सरकारवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले. दानवे यांच्या जिभेने मुख्यमंत्र्यांना ‘डंख’ मारण्याचे जे उद्योग आरंभले आहेत त्यामागे त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच तर नाही ना, अशी शंकाही या लेखातून उपस्थित करण्यात आली आहे.

[jwplayer Fn3ZTvQF]

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची लेखी हमी द्या, असे विधान रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. भाजप कर्जमाफीच्या विरोधात नाही परंतु त्याऐवजी पायाभूत सुविधा देऊन शेतीत शाश्वत गुंतवणूक करून वीज, पाणी, शेतमाल बाजारात पाठवण्यासाठी रस्ते तयार करण्यावर भर दिला जाणार आहे, त्यातून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, असे धोरण स्वीकारले जाणार आहे, असे दानवेंनी शिर्डी येथे बोलताना सांगितले होते. तसेच शिवसेनेच्या धमक्यांना भाजप घाबरत नाही, त्यांच्या इशाऱ्याचा सरकारवर काही परिणाम होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.