शेतकरी आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या भाजप सरकारला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजकीय पोळी भाजणाऱ्यांशी सरकार चर्चा करणार नाही, असे स्पष्ट केले होते. सरकार केवळ शेतकऱ्यांशीच चर्चा करेल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. मात्र, शेतकऱ्यांशी नेत्यांशी फक्त सरकारमधील शेतकऱ्यांनीच करावी. तसे करायचे झाल्यास तुमच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय? , असा खडा सवाल शिवसेनेने उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उगाच शेतकरी कल्याणाच्या गप्पा मारू नयेत, असा टोलाही सेनेने लगावला आहे.

शेतकरी कर्जमाफी गांभीर्याने घ्या!

शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाल्यापासूनच शिवसेनेने जाहीरपणे सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा संप फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांची शेवटची मागणी मान्य होईपर्यंत त्यांच्या पाठिशी राहण्याची भूमिका सेनेने घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ‘सामना’तील अग्रलेखातून शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर आसूड ओढण्यात आले आहेत.

शेतकरी संपाचं नेतृत्त्व करा, पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची राज ठाकरेंना विनंती

लढणाऱ्यांना गळास लावायचे व त्या स्फोटक बॉम्बची वात काढून घ्यायची आणि बॉम्बचा रबरी चेंडू बनवायचा हे प्रकार काँग्रेसने याआधी केले व महाराष्ट्रातील फडणवीस सरकार याबाबत काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत आहे. इतर बाबतीत भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसशी तीव्र म्हणजे टोकाचे मतभेद आहेत. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे त्यांनी मनावर घेतलेच आहे, पण काँग्रेसची काही ध्येयधोरणे मात्र त्यांनी पवित्र करून नव्हे तर जशीच्या तशी स्वीकारली आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.