भारत-पाक सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंगळवारी केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले. गुजरातमधील निवडणुका जिंकण्यासाठी व सुरतमधील संतप्त व्यापाऱ्यांची मते मिळविण्यासाठी ‘जीएसटी’त अनेक सवलती दिल्या गेल्या, पण सीमेवरील जवानांचे प्राण वाचविण्यासाठी तुम्ही काय केले?, असा सवाल सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.

लढाई सुरू नसूनही सीमारेषेवर भारतीय जवानांना प्राणांना मुकावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दशकांपासून ही नाचक्की सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळात ती थांबेल असे वाटले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत आणि आमच्या जवानांचे युद्धाशिवाय हुतात्मा होणेदेखील थांबलेले नाही. आपले सरकार बुळचट निघाले आहे. पाकड्यांचे हल्ले रोजच सुरू असून आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून असल्याचे ताशेरे शिवसेनेकडून ओढण्यात आले आहेत.

याशिवाय, भाजपचे नेतृत्त्व देशातील इतर समस्यांकडे लक्ष देण्यापेक्षा निवडणुकीच्या प्रचारातच अधिक गुंग असल्याचा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून आमच्या जवानांवर गोळीबार केला जात असताना पंतप्रधानांसह सारे मंत्रिमंडळ गुजरातेत निवडणूक प्रचाराच्या ‘वाफा’ दवडीत होते. काश्मीरात शांतता व सुव्यवस्था परतली आहे असा दावा करणाऱ्यांचे हे फोलपण आहे. गुजरातमधून विकास हरवला आणि कeश्मीरच्या सीमेवरून सुव्यवस्था व शांतता हरवली. या सरकारने गुजरातमधील निवडणुका जिंकण्यासाठी व सुरतमधील संतप्त व्यापाऱ्यांची मते मिळविण्यासाठी ‘जीएसटी’त अनेक सवलती दिल्या. मात्र, सीमेवरील जवानांचे प्राण वाचविण्यासाठी तुम्ही काय केले? व्यापाऱ्यांसाठी सरकार झुकते, पण सैनिकांची बलिदाने रोखण्यासाठी कुणाला काय पडले आहे? अशी खरमरीत टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.