“दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. पण ते तानाजी मालुसरे १६ व्या शतकातील होते. हा तानाजी २१ व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल” असे शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक आज सहकुटुंब प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते.
दोन आठवडयांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे घातले होते. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी करण्यात आली होती. “ईडीने ज्या नोटीस पाठवल्या, त्यांना उत्तर दिलं आहे. ईडी भारतातील मोठी संस्था आहे. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांनी बाहेर काढली आहेत. त्यामुळे या संस्थेला तपासात आवश्यक ती सर्व मदत करायची ही, प्रताप सरनाईकची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहिल” असे त्यांनी सांगितले.
“ईडी ज्यावेळेस चौकशीसाठी बोलवणार त्यावेळी मी चौकशीसाठी हजर होईन. मी त्यांना पत्र दिलं आहे. ईडीकडे मी जेव्हा मुदत मागितली तेव्हा त्यांनी मला मुदत दिली” असे सरनाईक यांनी सांगितले. जगावरील करोनाचं संकट आणि सरनाईक कुटुंबावरील ईडापिडा टळो, यासाठी बाप्पाला गाऱ्हाण घातल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 6:03 pm