मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी टीका केली. हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून गीतेविषयी आदर राखायलाच हवा, पण देशात किंवा महाराष्ट्रात ज्या ‘कॉन्व्हेन्ट’ स्कूल्स आहेत तेथे गीता वाटणार आहात काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव म्हणाले, ”आजच्या घडीला आजच्या युगाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मग जर का आपण मुलांचाच विचार करणार असू तर तुम्ही कुपोषणग्रस्त भागात जा आणि तिथल्या मुलांना भगवद्गीता वाचायला सांगा. काय करतील ते? त्याला भगवद्गीतेची गरज आहे की धान्याची… त्याला मूलभूत शिक्षणाची गरज आहे. भगवद्गीता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा प्रश्न आहे. ज्याला पाहिजे त्याने ती घेऊन वाचावी. पण एका बाजूला आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असू तर मग ती गीता तुम्ही डिजिटल करून देणार का? डिजिटल इंडियात भगवद्गीता तुम्ही कशी देता? भगवद्गीतेचे स्थान मी नाकारत नाही. आदरच आहे. पण आजच्या घडीला भगवद्गीता वाचण्यापेक्षा तुम्ही शिक्षण व्यवस्था का सुधारत नाही? आधीच ज्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे आहे त्या ओझ्यामध्ये गीतेचे ओझे का टाकता? नवे धार्मिक वाद निर्माण करायचे व लोकांच्या प्रश्नांवरून लक्ष हटवायचे. हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून गीतेविषयी आदर राखायलाच हवा, पण देशात किंवा महाराष्ट्रात ज्या ‘कॉन्व्हेन्ट’ स्कूल्स आहेत तेथे गीता वाटणार आहात काय? जिल्हा परिषद, म्युनिसिपल शाळांतच हे वाटप करू शकतात. भगवद्गीता द्या, हरकत नाही. त्यातून जर चांगली माणसं निर्माण होणार असतील तर अवश्य करा. पण ते शिकून डिग्रीचे भेंडोळे घेऊन बाहेर पडलेल्यांना नोकरी देता का तुम्ही?”

सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांना गीतेतला कोणता श्लोक तुम्हाला प्रभावित करतो? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उद्दव म्हणाले, ‘नाही बाबा, मी उगाचच सांगणार नाही की मला गीता येते. मी गीता वगैरे या भानगडीत कधी पडलेलो नाही. पण मी जे काही त्याबद्दल ऐकले आहे त्यात सारांश म्हणून विचाराल तर एवढंच वाटतं की धर्मासाठी लढाई करायला समोर उभा आहे तो शत्रू आणि आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून लढायला उभा आहे तो मित्र. या एका वाक्यातच कदाचित गीतेचं सार असावं असं मला वाटतं’.