शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांना हात घातला. मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी, यंदा योगायोगाने २७ जुलै रोजी तुमच्या वाढदिवशी गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही गुरूच्या भूमिकेत शिरला आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, अजिबात नाही. तो केवळ योगायोग आहे. मी गुरूच्या भूमिकेत अजिबात शिरलेलो नाही. मी कधीही गुरू होऊ शकेन असे मला वाटत नाही. पण हा योगायोग नक्कीच चांगला आहे. आई, वडील आणि गुरू ही तीन दैवते आपण आपल्या आयुष्यात मानायला हवीत असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव म्हणाले, ”आई, वडील आणि गुरू ही तीन दैवते आपण आपल्या आयुष्यात मानायला हवीत असं माझं मत आहे. आई-वडील तर नक्कीच आणि चांगला गुरू मिळाला तर ‘गुरुर्देव भवः जसं पितृदेव भवः, मातृदेव भवः’. आपण मगाशी जसे पुतळय़ाच्या उंचीवरून आपण बोललो तशीच व्यक्तिमत्त्वाची उंची आणि त्या उंचीची व्यक्तिमत्त्वं आहेत. पण तुम्ही कशासाठी त्यांना मानता हाही एक विषय आहे. तसं जर बघितलं तर मी म्हणेन की, एखाद्-दुसऱयाला गुरू मानण्यापेक्षा आपल्या आधीची पिढी, आई-वडिलांची पिढी ही आपल्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने आपण त्यांच्याकडे आदराने बघतो. पण काही वेळेला माझे म्हणणे असे आहे की, तरुण पिढीकडूनही आपण शिकण्याची गरज आहे. वय मोठे झाले म्हणून मी सर्वज्ञानी झालो असे काही नाही. तरुणही खूप शिकवून जातात”.

या मुलाखतीत उद्धव यांनी केंद्रातील मोदी सरकारची धोरणं, राष्ट्रीय राजकारण, भाजपाची भूमिका, छत्रपती शिवरायांचं स्मारक, शेतकऱ्यांचं आंदोलन यांसारख्या विविध विषयांवर परखड भाष्य केलं आहे.