भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मातोश्री भेट व्यर्थ ठरणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला भाजपाविरोधी सूर कायम ठेवला आहे. शिवसेनेने पालघरमध्ये साम-दाम-दंड-भेद वाल्यांना घाम फोडला. आता नाटकं सुरु आहेत, पिक्चर अभी बाकी हैं असे विधान उद्धव यांनी केले आहे. पालघरमध्ये निवडणूक प्रचारा दम्यान पैसे वाटण्यात आले, त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे. श्रीनिवास वनगा दिवंगत भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे सुपूत्र आहेत. एकूणच उद्धव यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अमित शहा यांची मातोश्रीवरील शिष्टाई फळाला येणार नाही असेच दिसत आहे.

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला असून तसा ठराव देखील पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. भाजपावर नाराज होऊन स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक असल्याचे वृत्तही समोर आले. दुखावलेल्या दोन्ही पक्षांमध्ये या भेटीनंतर समेटाची स्पष्ट चिन्हे निर्माण झाली होती. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आणखी भेटीगाठी होणार असल्याचे सांगण्यात आले.