उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून निषेध करण्याच्या पवित्र्यात

‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’च्या खातेदारांना दिलासा मिळावा यासाठी ‘रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भेट घेणारे शिवसेनेचे खासदार ‘सिटी को-ऑपरेटिव्ह बँके’बाबत उदासीन असल्याने या बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दीड वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही बँकेबाबत तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्र पाठवून निषेध करण्याची मोहीम खातेदारांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पीएमसी पाठोपाठ सिटी बँकेचा मुद्दाही निवडणुकीच्या तोंडावर तापणार आहे.

व्यवहारांमध्ये अनियमितता असल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने १८ एप्रिल २०१८ रोजी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर र्निबध लादले. त्यामुळे खातेदार अडचणीत आले आहेत. या बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ शिवसेनेचे खासदार असल्यामुळे खातेदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकप्रकरणी दहा दिवसांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन खातेदारांना देण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे बँकेचे खातेदार संतप्त झाले आहेत. या बँकेच्या खातेदारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांनी आयुष्यभराची कमाई बँकेत ठेव स्वरूपात ठेवली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध घातल्यामुळे खातेदारांना पैसे मिळणे बंद झाले आहेत. यामुळे खातेदार अडचणीत आले आहेत.

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकप्रकरणी शिवसेनेच्या खासदारांनी मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरची भेट घेतली. या प्रकारामुळे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार प्रचंड संतप्त झाले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी अध्यक्ष असलेल्या बँकेला वाऱ्यावर सोडणाऱ्या शिवसेनेबद्दल खातेदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहा दिवसांमध्ये प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन खातेदारांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्र पाठविण्याचा निर्णय समस्त खातेदारांनी घेतला आहे. निषेध म्हणून पत्र प्रपंचाचे आंदोलन राबविण्यात येणार असल्याचे खातेदार अभय पानसे यांनी सांगितले. समस्त खातेदारांनी या आंदोलनात सहभागी होऊन उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवावे, असे आवाहन खातेदार चेतन मदन यांनी केले आहे.