काँग्रेस-राष्ट्रवादीपाठोपाठ आता मित्रपक्ष शिवसेनेनेही राज्याच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. मुंबई शिवसेनेची असल्यानेच अर्थसंकल्पात मुंबईवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आले नसल्याने सर्वसामान्य मुंबईकर नाराज झाल्याचे सुनील शिंदे यावेळी म्हणाले. बीडीडी चाळ, गिरणी कामगारांची घरे आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली नसल्याचेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, मुंबई फक्त शिवसेनेची नसून भाजपचेही १५ आमदार मुंबईत आहेत त्यामुळे दुर्लक्ष झाल्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा विपर्यास झाल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.